अर्थशास्त्र म्हटलं की डोक्याचा भुगा होतो. संकल्पना , त्या मोठमोठ्या थिअरीज समजत नाहीत ? तर टेन्शन घेऊ नका. अर्थशास्त्राचा अर्थ समजून घेण्याची एक संधी आहे! इकॉनॉमिक्स क्लब ऑफ मुंबई या संस्थेने दि. ७-८ सप्टेंबरला अर्थमंथन या फेस्टिवलचं आयोजन केलंय. दोन दिवसांचा हा फेस्ट चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये संपन्न होणार आहे.
मुलांना अर्थशास्त्राची भिती वाटते याची अनेक कारणं आहेत , विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल केले जात नाहीत. वर्षानुवर्षे ठराविक साच्यातल्या संकल्पना मुलांना शिकवल्या जातात. अभ्यासाच्या , रेफरन्सच्या दृष्टीने परिपूर्ण अशी पाठ्यपुस्तकेही आज बाजारात उपलब्ध नसतात. मुळात अत्यंत रंजक असणाऱ्या या विषयाकडे वळणाऱ्या मुलांचं प्रमाणही कमी झालंय. या सगळ्यावर काहीतरी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने २००१ साली इकॉनॉमिक्स क्लब ऑफ मुंबईची स्थापना करण्यात आली. गेली दहा वर्षे हीच संस्था ' अर्थमंथन ' चं आयोजन करतेय.
यंदा अर्थमंथनमध्ये अनेक मनोरंजक स्पर्धा आहेत. वादविवाद , वक्तृत्त्व अशा स्पर्धांमधून स्पर्धकांना चालू घडामोडींवर भाष्य करता येईल. याखेरीज इकॉनॉमिक कल्पनांवर आधारित कार्टून मेकिंग , पोस्टर मेकिंग याही स्पर्धांचा यात समावेश आहे. यात सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सिंगिंग इव्हेंट! दारिद्र्य , महागाई , मंदी , भ्रष्टाचार , सरकारची एखादी सुविधा अशा हट के संकल्पना घेऊन त्यावर कविता रचून गायच्या आहेत! याखेरीज भाषणे , चर्चासत्रंही या फेस्टिवलमध्ये आहेत. डोक्याला चालना देणाऱ्या आणि अर्थशास्त्राची परिभाषा बदलून टाकणाऱ्या या फेस्टला भेट द्यायलाच हवी.
या बातमीवर तुमचं मत मांडण्यासाठी इथे क्लिक करा
No comments:
Post a Comment